
बोरिवली -पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि बोरिवली दरम्यान बीडीटीएस – अमृतसर एक्स्प्रेस आणि एका मालवाहतूक ट्रकचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती सोमवारी समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रक आणि रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेसेवा काही कालावधीसाठी विस्कळीत झाली होती.मिळालेल्या माहितीनूसार, पश्चिम रेल्वे मार्गावर ०२९२५ क्रमांकाची ब्रांद्रा ते अमृतसर एक्स्प्रेस ट्रेन दुपारी कांदिवली आणि बोरिवली दरम्यान जात होती. मात्र रेल्वे मार्गाशेजारी कंत्राटी एजन्सीचा रेतीने भरलेला ट्रक उभा होता. मागून आलेल्या ब्रांद्रा ते अमृतसर एक्स्प्रेस ट्रेनला ट्रकने धडक दिली. त्यामुळे ट्रकच्या मागील भाग कोसळून रेल्वे मार्गाखाली कोसळला.तसेच या धडकीत रेल्वेच्या इंजिन आणि डब्यांचेसुद्धा नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचून चालकालासह ट्रकला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर ट्रकला बाजूला काढण्यात आले आहे.तसेच रेल्वे इंजिनच्या समोरच्या भागाचे नुकसान झाल्याने बोरिवली रेल्वे स्थानकात या बीडीटीएस- अमृतसर एक्स्प्रेस इंजिन बदली करून गाडीला पुढे पाठवण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश पश्चिम रेल्वेने दिले आहे. मात्र या घटनेमुळे रेल्वे वाहतूक काही कालावधीसाठी विस्कळीत झाली होती…!
