नाशिक : श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर(SNPT) इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तर्फे “Think Health, Think Pharmacist” या घोषवाक्याखाली विश्व फार्मासिस्ट दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅलीचे उद्घाटन पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व प्राचार्यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. विशाल एस. गुलेचा यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी फार्मासिस्ट हा आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले. औषधांचे योग्य मार्गदर्शन, रुग्ण व डॉक्टर यांच्यातील दुवा आणि समाजात निरोगीपणाचा संदेश देण्याचे कार्य फार्मासिस्ट पार पाडत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.रॅलीची सुरुवात पी.ई.एस. कॅम्पस येथून झाली. आडगाव नाका सिग्नलवर विद्यार्थ्यांनी धूम्रपान व दारूसेवनाचे दुष्परिणाम दर्शवणारी जागरूकता नाटिका सादर केली. त्यानंतर पंचवटी करण्जा येथे ‘ADR’ (Adverse Drug Reaction) या विषयावर प्रभावी नाटिका सादर करून जनजागृती केली. पुढे निमाणी बसस्थानकावर विद्यार्थ्यांनी नाटिकेसह औषधांविषयी प्रश्नमंजुषा घेऊन नागरिकांमध्ये औषध वापराविषयीची माहिती पोहोचवली.यावेळी विद्यार्थ्यांनी परिसरातील औषध दुकानांचे मालक यांचा सन्मान करून त्यांचे समाजासाठीचे योगदान गौरवले.या उपक्रमाचे समन्वयन डॉ. मनीषा टायडे व डॉ. रुपाली डिकले यांनी केले. सर्व अध्यापन व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी मन:पूर्वक आभार मानले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. नरेंद्रभाई ठाक्कर, उपाध्यक्ष मा. प्रकाशभाई पटेल, कार्यालयीन सचिव मा. देवेंद्रभाई पटेल, एस.एन.पी.टी. सचिव मा. उपेंद्रभाई दिनानी व संयुक्त सचिव मा. अभयभाई चौकशी यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन फार्मासिस्ट समुदायाचे अभिनंदन केले. तसेच SNPT च्या सर्व टीमचे रॅली यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल कौतुक केले.ही भव्य रॅली विद्यार्थ्यांच्या उत्साह, शिक्षकांच्या मार्गदर्शन व समाजाभिमुख विचारांची प्रभावी अभिव्यक्ती ठरली.











