मुंबई : सध्याच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या युगात कुटूंबाला वेळ देणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीत स्नेहसंमेलनानिमित्त संपूर्ण समाजाला एकत्र करण्याचा मराठा हितवर्धक मंडळ डोंबिवली यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. यानिमित्त जुन्या-नव्या पिढींच्या विचारांची देवाण-घेवाण होते. ज्या पूर्वसुरींनी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण होते त्यामुळे असे संमेलन होणे गरजेचे आहे. अशा संमेलनातून कुटूंबाबरोबरच समाज जोडला जात असतो, विचारांची देवाणघेवाण झाल्यामुळे यातून एक चांगला समाज निर्माण होण्यास मदत होते. मराठा हितवर्धक मंडळाचे हे काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केले. शेकडोंची उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी विश्वस्त सौ स्मिता बागवे उपस्थित होत्या.मराठा मंदिर इमारतीच्या सभागृहात डोंबिवली येथील मराठा समाजाचे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मालुसरे आपल्या भाषणात पुढे असेही म्हणाले की, समाज व्यवस्थेत काम करताना समाजाच्या गरजा काय आहेत, हे कोणत्याही काळात काम करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे, आपण समाजाचे कसे देणं लागतो आणि समाजाचे उतराई कसे होता येईल ? याचे भान ठेवून सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने होतो आहे. भौतिक विकासाबरोबर शारीरिक सामाजिक सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी मंडळ सातत्याने प्रयत्न करीत असते ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे, हे कार्य समाजाचे कार्य आणि सर्व उपक्रम तळागाळात पोहोचविण्यासाठी परस्पर सामंजस्य आणि एकजुट आणि न विसरता येईल अशी संस्थेच्या चेहऱ्याची ओळख हवी.यावेळी चित्रकला, हस्ताक्षर, निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा, महिला भजन मंडळ, आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सत्कार करून गुणगौरव करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र देसाई यांनी संस्थेच्या सर्वांगीण कार्याचा, उपक्रमांचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिटणीस विजय अ. राऊत, विश्वस्त सर्वश्री श्रीराम चाळके, विद्याधर शेलार, मारुती माने, प्रकाश चव्हाण आणि प्रशांत देसाई, उमेश चाळके, अनिल पालांडे, निलेश सावंत, विजय शेलार, सौ राजश्री कदम, अर्पिता जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.