मनपा शाळा क्र.७१ मध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

0

नाशिक : सिडकोच्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये शाळेचा पहिलाच दिवस “शाळा प्रवेशोत्सव” म्हणून विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.नगरसेविका हर्षाताई बडगुजर होत्या. यावेळी शालेय गीतमंचाने ईशस्तवन व स्वागतपद्य गात मान्यवरांचे स्वागत केले. तद्नंतर मा. हर्षाताई बडगुजर यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी करताना शाळेच्या यशाचा चढता आलेख पालकांसमोर मांडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालक -शिक्षक परस्पर सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, सदस्य प्रणिता कोल्लूर, कल्पना देविकार, दर्शना पाटिल, सागर देसाई, पूनम माकडे, शितल भालेराव इ.उपस्थित होते.
यावेळी नवागत मुलांचे औंक्षण व गुलाबपुष्प देऊन स्वागत मा. नगरसेविका हर्षाताई बडगुजर व शाळेतील शिक्षिकांनी केले. तद्नंतर उपस्थित नवागत बालकांनी व्यासपीठासमोरील चाॅकलेटच्या झाडाभोवती फेर धरत चाॅकलेट आपल्या हातांनी तोडून खाण्याचा यथेच्छ आनंद लुटला. पहिलीच्या वर्गशिक्षिका रुपाली ठोक व योगिता खैरे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चाॅकलेट वाटून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश प्रातिनिधिक स्वरूपात मा. नगरसेविका हर्षाताई बडगुजर यांच्याहस्ते वितरीत करण्यात आले.
अध्यक्षपदावरुन बोलताना मा. हर्षाताई बडगुजर यांनी शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीचे कौतुक करत दैनंदिन जीवनातील विविध प्रसंग,उदाहरणे सांगत पालकांना मनपा शाळेचे महत्व सांगितले. तसेच शाळेसाठी जेथे कमी तेथे आंम्ही कटिबद्ध असल्याचे उपस्थित पालकांना सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली किसन काळे व प्रमिला देवरे यांनी केले. सूत्रसंचलन विनोद मेणे यांनी तर आभारप्रदर्शन शोभा मगर मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद मेणे, किसन काळे, प्रमिला देवरे, शोभा मगर, कविता वडघुले, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, वर्षा सुंठवाल, किर्तीमाला भोळे, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, प्रविण गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here