गणेशोत्सव काळात विविध प्रदूषणांबाबत शाळा क्र ७१ कडून पथनाट्याद्वारे चौकाचौकात जनजागृती

0

नाशिक : हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र.७१ ने गणेशोत्सव काळात विविध प्रदूषणांबाबत परीसरात एक अभिनव उपक्रम राबविला. सण उत्सव काळात नद्यांचे विविध प्रकारे प्रदूषण होत असते हेच प्रदूषण कमी करण्यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्याचे शालेय मंत्रीमंडळ बैठकीत ठरविण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी कार्यानुभव विषयाअंतर्गत कागदी पिशव्या तयार केल्या. परीसरातील नागरीकांना या कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.गणेशोत्सव काळात निर्माल्य नदित न टाकता कागदी पिशव्यांमध्ये जमा करुन निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन विद्यार्थी व शिक्षकांनी परीसरातील नागरीकांना केले. गोदावरी नदी तसेच नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी, नद्यांचे महत्व जनमानसांत बिंबवण्यासाठी विद्यार्थ्यांनी चौकाचौकात जाऊन ” माणसाने छळले नदीला” व नद्या संवर्धन काळाची गरज” या पथनाट्यांद्वारे जनजागृती केली. तसेच नळावाटे येणाऱ्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. गणेशोत्सव काळात शाडू मातीच्याच गणपतीची प्रतिष्ठापना करावी. गणपती विसर्जन नदीपात्रात न करता घरच्या घरी तसेच कृत्रीम तलावांमध्ये करावे असेही आवाहन परीसरातील नागरीकांना केले.
पथनाट्य सादरीकरणापूर्वी शिक्षिका रुपाली ठोक यांनी या अभिनव उपक्रमाची व पथनाट्यांची पार्श्वभूमी विशद केली. तर पथनाट्यानंतर मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी विविध उदाहरणांतून मानवच नदी प्रदूषणासाठी जबाबदार असल्याचे प्रतिपादन करुन प्रदूषण कमी करण्यासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध व्हायला हवे असे आवाहन परीसरातील नागरीकांना केले.या उपक्रमात शालेय मंत्रीमंडळाबरोबरच इ. ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमिला देवरे, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, किसन काळे, विनोद मेणे यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here