पनवेल: उत्तम वक्ता होण्यासाठी, संवाद साधताना मनातील न्यूनगंड दूर करणे, सभा गाजविण्यासाठी अथवा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी शब्दांची उत्तम जाण असणे आणि भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ संपादक कांतीलाल कडू यांनी केले.पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्राने पुणे येथून राज्यभरातील प्रशिक्षणार्थीसाठी गेले दहा दिवस संवाद कौशल्य आणि उत्तम वक्ता यासंदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. त्याचा सांगता समारंभ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑन लाईन सेवा प्रणाली द्वारे झाला. त्यावेळी ते बोलत होते. शिबिरात पुणे, नाशिक, जळगाव, सांगली, सातारा, पनवेल येथील शिबिरार्थीनी सहभाग घेतला होता. त्यांना मार्गदर्शन आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दोन तास हा सोहळा रंगत गेला होता.
कडू म्हणाले की, भाषेचा अभ्यास करताना दर्जेदार साहित्याच्या वाचनाची आवड असायला हवी. भाषण. देताना धाडस तर अंगी असलेच पाहिजे परंतु हजरजबाबीपणाही असायला हवा. सभेत बोलताना शब्दांवर प्रेम तर हवेच परंतु बोलण्याची शैली अंगीकारताना श्वासावर नियंत्रण ठेवून आवाजातील लय सांभाळता आली पाहिजे. कुठे थांबायचे हे ज्याला कळते आणि कुठे तोल सावरायचा याचे स्मरण ठेवतो तो उत्तम वक्ता होऊ शकतो असे कडू यांनी सांगितले.भाषेची नजाकत आणि गोडी जपता आली पाहिजे. सार्वजनिक सभा समारंभात भावनिक न होता विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून समयसूचकतेचे पालन करण्याची मनाची तयारी ठेवून व्यासपीठाचा आदर केला गेल्यास सभा जिंकणे अधिक सोपे जाते असा दावा त्यांनी केला. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक काही टिप्स दिल्या. काही नेत्यांची विशिष्ट शैलीतील भाषणांचे मुद्दे पटवून देताना सभाधीटपणा अंगी असण्याची आणि त्याकरिता वाचन, मनन, पठण करण्याचा सल्ला त्यांनी दिला.दाक्षिणात्य भाषांप्रमाणे मराठी भाषेला आजही अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नसल्याबद्दल कडू यांनी खंत व्यक्त केली. ज्ञानयोगी ज्ञानेश्वर माऊलींने मराठी भाषेचा गौरव केला आहे. ती जाण ठेवून तरी केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असे मत व्यक्त केले.प्रशिक्षक प्राची भगत, माहेश सोनी, सागर ननावरे त्याशिवाय सुनिता तोमर, अमरसिंह राजपूत, तेजश्री विसपुते, दिप्ती शाह, युवराजसिंग राजपूत, सुभाष यादव, रुपाली ढोमसे आदी प्रमुखांचा सहभाग होता. पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष विजय सूर्यवंशी हे आयोजकांच्या भूमिकेत उपस्थित होते.
Home Breaking News संवाद कौशल्य प्रशिक्षणाच्या ‘ऑन लाईन’ सांगता समारंभात कांतीलाल कडू यांचे प्रतिपादन