सिडकोचा झाला अजब गजब कारभार

0

नाशिक-आम्ही नवीन शहरे बसवतो नवीन गावे गावांची निर्मिती करतो असे ब्रीद मोत्याप्रमाणे मिरवत आता ‘आम्ही खाटाही टाकतो आणि चादर बदलतो म्हणत सिडकोने राजेशाही वेश्याव्यवसायाला चालना दिली आहे असे म्हणावे लागेल. सिडकोने मुंबईत हॉस्पिटल सुरू करून कोरोनो रुग्णांची सेवा साधली त्याचा निश्चित आनंद आहे. परंतु, कोरोना राक्षसाच्या विळख्यात सिडकोचा प्रकल्पग्रस्त, शेतकरी अडकला आहे, त्याच्यासाठी जर दुसरे रूग्णालय उभारले असते तर 1984 च्या गौरवशाली लढ्यातील पाच हुतात्म्यांच्या आत्म्याला शांती लाभली असती. त्या लढ्यातील काही जखमी योद्धे आज कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यावर जर उपचार करण्यासाठी सिडकोने पुढाकार घेतला असता तर गेल्या चाळीस वर्षात 95 गावातील शेतकरी हक्कासाठी लढा देत आहेत, त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची फुले झाली असती. तीच फुले पुन्हा सिडकोच्या चरणी अर्पण करून पाद्यपूजा बांधता आली असती. पण ते सौभाग्य सिडकोच्या कपाळी नाही. व त्याचा मान सन्मान त्यांनी तो मिळवलेला नाही ,ती एक बाजारू, व्यापारी धोरणांना चालना देणारी घरबसवी आहे, असे नाईलाजास्तव म्हणावे लागत आहे.
सिडकोने नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी ठाणे आणि वांद्रे यांच्या मध्यभागी मुलुंडला मोठे अद्यावत कोविड हॉस्पिटल उभारले. विविध ठिकाणी त्यांचे उपक्रम चालू आहेत, अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. त्याबद्दल कौतुक करायला हवेच. पण सिडकोची ही कृती कोरोनाबाधितांना आधार देण्यापेक्षा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शाबासकी मिळवण्यासाठीच आहे. त्यात त्यांचा सेवाभाव आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही.
सिडकोने प्रकल्पग्रस्तांशी ही प्रतारणा पहिल्यांदाच केली असे नाही. 1972 ला जन्माला आलेल्या सिडकोने ‘फोडा आणि राज्य करा’, ही ब्रिटिश पद्धत अवलंबिली. राज्यातील ही घरभेदी ब्रिटिश अवलाद आहे. त्यात सिडकोचा प्रशासकीय कारभार बहुतांश दिल्लीच्या महाराष्ट्रद्वेषी अधिकाऱ्यांच्या हाती राहिला आहे. त्यांनी वेळ साधून केसाने गळा कापला आहे. व जनतेची दिशाभूल केली त्यांच्या जोडीला काही आपलेच गद्दार आहेत. मग काय, मोकळे रान त्यांना मिळाले आहे.
ज्या मुंबईत महापालिका, राज्य शासन, उद्योजक रतन टाटांसारखी माणसं खोऱ्याने पैसा ओतून हॉस्पिटल, व्हेंटिलेटर निर्माण करतात तिकडे सेवेचे नगारे वाजवण्याऐवजी सिडकोने नवी मुंबई, पनवेल किंवा उरणला एखादे पाचशे खाटांचे हॉस्पिटल उभारले असते तर शेतकऱ्यांचे कुलदैवत, दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांनी सिडकोचे गुणगान स्वर्गातून गायले असते. परंतु, श्रीमंतांच्या शामियानातील रत्नजडित पलंगावर शय्यासोबत करण्याचा नाद जडल्याने सिडकोने शेतकऱ्यांच्या जमिनीतील पावित्र्य नष्ट केले आहे. तिला ते यापूर्वीही कधी जपता आले नाही.
सिडकोने काही अल्लाउद्दीन खिलजींना सोबत घेवून स्थानिकांची मंदिरे तोडली, घर फोडली, भावाभावात द्वेषभावना पेरून त्यांना तुरुंगात धाडले आणि काम साधले. अल्लाउद्दीन खिलजींना वतन बहाल केले. ते सुद्धा आयुष्यभर सिडकोसाठीच कंठशोष करतात. स्थानिकांसाठी योगदान फक्त दाखविण्यापुरते राहिले आहे. सिडकोसोबत हातमिळवणी करून व्यापारीकरणात त्यांचा पाय गुंतवून ठेवला आहे. सिडको प्रशासनाला ही ग्यानबाची मेख ठावूक असल्याने त्यांनी स्थानिक, प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांची कधीच थडगी बांधली आहेत. त्यांना औकात माहित आहे आणि बाजारमूल्यही. ते कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. एक मात्र खरे आहे, दिबा असते तर सिडकोने मुलुंडला हॉस्पिटल उभारण्याऐवजी पहिला प्रयोग नवी मुंबईत केला असता. कारण दिबांचे केवळ हातच नाही तर ते नखशिखांत पवित्र होते.
सिडकोने प्रकल्पग्रस्तांसोबत इतका अनाचार केल्यानंतर एकही समाजसुधारक, नेते, कैवारी अशा उपाधी गळ्यात लटकवून बुद्धिभेद करणाऱ्यांनी सिडकोविरोधात आंदोलनाचा इशारा दिला नाही किंवा द्यायला तयार नाही. कुणीही रस्त्यावर आडवे लोळण घेण्यासाठी उतरले नाहीत. भाडोत्री कार्यकर्तेही बोलावले नाहीत. कारण त्यांचे सुरळीत चालले आहे. त्यांच्या बुडाखाली जर धग लागली की, मोर्चे, आंदोलने, तोडफोड, मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी सगळे कसे रान पेटल्यासारखे धावत सुटतात. आता त्याची त्यांना काय, कुणालाच गरज नाही. सिडकोने अनेकांच्या नाड्या हातात ठेवल्या आहेत. ठरल्याप्रमाणे ते मारल्यासारखे वागतात आणि हे रडल्यासारखा सुतकी आव चेहऱ्यावर आणतात. असे हे सत्ताचक्र सिडकोने हाती ठेवून सुदर्शन स्थानिकांवर सोडले आहे.
सिडकोला रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील 95 गावांतील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत तसेच विविध ठिकाणी दिल्या. त्या गावातील कोरोनाबाधितांचा आकडा दहा हजारांपेक्षा जास्त आहे. त्यांच्यासाठी काय केले? तर नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाच्या समोरील मोकळे वातानुकूलित सभागृह दिले. नेरूळचे आगरी कोळी भवन नवी मुंबई महापालिकेला उपलब्ध करून दिले. परंतु, काळीज मात्र मुंबईकरांवर उधळले, ते सुद्धा मनगटावर मोगऱ्याचे गजरे बांधून. सौभाग्यवतीसारखा कुंकवाचा मळवट भरून. सजून, सजवून तयार झालेल्या सिडकोने मुंबईकरां सोबत एका रात्रीत पाट लावला आणि हनिमूनही उरकून घेतले. हा व्यभिचार नाही तर काय म्हणावा?
लोकेश बाबूसारख्या मोडक्या बांबूनी स्थानिकांची तिरडी वारंवार सजवली आहे. स्थानिकांना ते कवडी मोलाचीही किंमत देत नाहीत. हक्कासाठी उपोषण करणाऱ्या विमानतळ बाधितांचे काही महिन्यांपूर्वी जे हाल केलेत ते सर्वश्रुत आहेत. स्थानिकांच्या जमिनींवर पैसे कमवायचे हा तर उत्तम अश्व खरेदीचा व्यवहार करून, स्थानिकांना फसवत अरबोघरबो ने झोळ्या भरण्याचा धंदा सिडको करत आहे. स्थानिक फक्त दातओठ खात आहे आणि सिडको वेश्याव्यवसाय केल्यागत स्वतःचा कुठेही लिलाव करीत आहे.
कोरोना काळात कुणीही भेदभाव करणे हे महापाप आहे. नवी मुंबईतील पनवेल आणि उरण ही अरण्य आहेत. अजूनही इथे लौकिकार्थाने विकासचक्र दृष्टीस पडत नाही. त्यातही नवी मुंबई महापालिकेचे ठिक आहे. परंतु पनवेल महापालिकेची अजून कूसही उजवली नाही. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. यंत्रणा तोकडी आहे. जेएनपीटी नावाची शुर्पणखा, तळोजा औद्योगिक वसाहत नावाची चेटकिण, जेएसडब्ल्यू नावाचा भस्मासूर पनवेल महापालिकेला पोसावा लागत आहे. जणू काही या कंपन्या दत्तक घेतल्यासारखे त्यातील कोविड रुग्ण महापालिका सांभाळत आहे. अरे काय संबंध? अख्खा रायगड महापालिकेच्या पदरात टाकून अनेकांनी उंटावरून शेळ्या हाकल्या आहेत व मजा बगताय. हा सगळा कारभार म्हणजे उंटांच्या लग्नाला गाढवाचे संगीत असा आहे. महापालिकेला आई-बाप नाही. त्यामुळे कुणीही यावे आणि टपली मारुन जावे तसे आमच्या प्रशासनाला, डॉक्टरांना कोविडच्या नावाखाली राबवून घेत आहेत.
ही व्यथा सिडकोला कशी दिसली नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ध्यानात कशी आली नाही. ही शिवशाही नव्हे, मुळीच नाही. एकाचे घर लुटायचे आणि दुसऱ्यांचे महल सजवायचे ही सुलतानशाही आहे. मुंबईत काय राज्यात सिडकोने आणखी हॉस्पिटल उभारावे, अगदी केंद्राला हात द्यावा, कुणाचीच तक्रार येणार नाही. पण स्थानिकांच्या टाळूवरचे लोणी पळवून दुसऱ्यांना जीवदान देणे हे पुण्यकर्म ठरणार नाही, याचे भान सिडकोने ठेवायला हवे होते. तितकी तरी पावित्र्यता जपली असती तर पनवेल महापालिकेला एखद्या हॉस्पिटलची उभारणी करून दिली असती. जशी सिडको तशीच जेएनपीटी, तळोजा एमआयडीसी आणि जेएसडब्ल्यूसुद्धा. गिऱ्हाईक पाहून पदर खाली टाकणाऱ्या संस्था आहेत. त्यांनी लाज, काहीतरी उपयोग झाला पाहिजे अन्यथा शेती चालू राहिली तर त्याचा काही फायदा झाला असता परंतु नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here