अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्रातील राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविल्यानंतर आता मुळा पाटबंधारे आणि भंडारदरा धरणाच्या कालव्याच्या भिंती लगतच्या क्षेत्रातील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम शासनातर्फे जोरात हाती घेण्यात आली असून राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे दिनांक २५ एप्रिल २०२५ या दिवशी या सिंचन सुधारणा कामाचा भुमीपुजन समारंभ ही संपन्न होत आहे.जलसंपदा विभागाचा जलद गतीने “झट मंगणी आणि पट शादी “या म्हणी प्रमाणे विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे.जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले,नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे, आणि शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे तसेच जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती सुभाष पाटील आणि माजी खासदार सुजय विखेपाटील यांच्या उपस्थितीत हा भुमिपुजन सोहळा संपन्न होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शोधमोहीमेत राहुरी, नेवासा, शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील जवळ जवळ ८६० ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे झाली आहेत असे निदर्शनास आले आहे.ही अतिक्रमणे कालवे आणि वितरीका जवळच्या शासकीय जागेवर झालेली आहेत.ही अतिक्रमणे तातडीने हटवण्याचा इशारा जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार हा अतिक्रमण धारकावर कारवाईचा बडगा उगारला आहे.त्यामुळे अतिक्रमण धारक शेतकऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटीसा पाठवायला सुरुवात झाली आहे.ज्या शेतकऱ्यांनी कालवे आणि वितरीका जवळच्या शासकीय जागेवर पक्की घरं, कांदा चाळी, जनावरांचे गाय गोठे, पाण्याचे हौद, या सारखी पक्की बांधकामे केलेली आहेत त्यांनी आठ दिवसांच्या आत स्वतः हुन आपली अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावीत अशा सुचना जलसंपदा विभागा मार्फत पाठविलेल्या सदर नोटीसीत देण्यात आल्या आहेत.जे शेतकरी स्वतः हुन अतिक्रमणे तातडीने काढून घेणार नाही त्यांची नोटीसीतील आठ दिवसांची मुदत संपल्यानंतर पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे तातडीने हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.पाटबंधारे विभागाने पहिल्या टप्प्यात ८०० हुन जास्त शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.कालवे आणि वितरीकांच्या जवळच्या मोकळ्या जागा तसेच कालव्याच्या भिंतीवरील वेड्या बाभळीच्या काट्या ,रिकाम्या करणं अत्यंत गरजेचं आहे.जेणेकरून पाणी पुरवठा सुरळीत चालू राहील असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.तर ही कारवाई शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारी आहे असे अतिक्रमण धारक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.अनेक शेतकऱ्यांनी या जागेवर मोठ मोठी गुंतवणूक करून पक्कीघरे, गोठे, चाळी, पाणवठे बांधलेले आहेत.राहुरी, नेवासा, शेवगाव पाथर्डी या चार तालुक्यात आता तातडीने अतिक्रमणे हटवण्याच्या प्रश्नावरून चांगलेच राजकारण पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.वरील चार ही तालुक्यातील आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत.ते शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतात की मंत्र्यांच्या आदेशाला पाठींबा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या ५२ वर्षापासुन मुळा पाटबंधारे विभाग या कालव्याचे आणि वितरीकाचे आपले कर्म चारी व अधिकाऱ्या मार्फत व्यवस्थापन करीत होते मग त्यांना तेव्हा ही अतिक्रमणे दिसली नाहीत का ते फक्त शेतकऱ्यांना अमिषे दाखवून लुटच करीत होते की काय असा सवाल आता शेतकरी विचारू लागले आहेत.जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार ही ८६० ठिकाणची अतिक्रमण शोधून काढली असे जरी वरवर सांगितले जात असले तरी काही धनदांडग्यांची अतिक्रमणे जाणिव पुर्वक दुर्लक्षीत केली आहेत.ते काय मंत्र्यांचे जावंई आहेत काय असा सवाल काही अतिक्रमण धारक शेतकऱी विचारू लागले आहेत.सन१९७२ साली राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर या नदीवर २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे हे मुळा धरण बांधण्यात आले आहे.या धरणाचा डावा कालवा हा २५ किलोमीटर लांबीचा तर उजवा कालवा हा ५२किलोमीटर लांबीचा आहे.परंतू काही पाणीचोर शेतकऱ्यांनी कालव्यांच्या आणि वितरीकांच्या भिंतीला जेसीबीच्या सहाय्याने भगदाड पाडून त्यामध्ये पाच ते दहा इंची पाइपलाइन गाडून थेट जमिनीखालून पाण्याची राजरोसपणे चोरी केली आहे त्यांचे काय ? पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक देवाणघेवाण आणि मिलीभगत करून ही पाइपलाइन द्वारे पाणी चोरी होते त्यांवर जलसंपदा विभाग गप्प का असा सवाल आता अतिक्रमण धारक शेतकऱी विचारू लागले आहेत.त्यांचे म्हणणे आहे की अनेक शेतकऱ्यांनी विनापरवाना मुळा पाटबंधारेच्या मुख्य भिंती फोडून, शाखा वितरीका फोडून त्यामध्ये गुपचूप पाईप लाईन गाडून थेट जमिनीखालून आपल्या शेतातील विहिरीत पाणी सोडले आहे.त्यांना पाटबंधारे विभागाचे अधिकारी चिरीमिरी घेऊन अभय देतात त्यांच्या वर ही कारवाई झाली पाहिजे असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच त्यांचे असेही म्हणणे आहे की जी अतिक्रमण झालेली आहेत ती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच झाली आहेत.त्यांच्यावर प्रथम कारवाई झाली पाहिजे.त्यांनी बोकड पार्ट्या करून अतिक्रमण धारकांना त्यावेळी प्रोत्साहन दिले होते.”पाटील,तुम्ही बांधकाम करा आम्ही आहोत ना” अशी भूमिका घेतली होती ते नामानिराळे राहिले आहेत आणि आता शेतकऱ्यांना बळीचा बकरा बनून अधिकाऱ्यांचे ऐकून केलेली अतिक्रमणे काढून घेण्याची वेळ आली आहे. अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या मुळे चार ही तालुक्यातील शेतकरी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.आणि शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
Home Breaking News मुळा पाटबंधारेच्या अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना नोटीसा आणि भुमिपुजनाचा समारंभही, झट मंगणी,पट शादी,...