कोल्हापूर, दि.25(जिमाका): ‘वसुदैव कुटुंबकम’ या तत्वावर वाटचाल करणारा आपला भारत देश अनेक देशांना सहकार्य करत विकास साधत असून देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने सामाजिक न्यायाचे विचार अंगिकारायला हवेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केले.विवेक विचार मंच, सहयोगी संस्था व शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या सभागृहात राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार व कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनील वारे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, प्र.कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विवेक विचार मंचचे अध्यक्ष प्रदीप रावत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी सामाजिक न्यायासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या श्री.दौलतराव खरात, बुलढाणा, विदर्भ, श्री. वाल्मिक निकाळजे,बीड, मराठवाडा, श्री. योगेश शिंदे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, प्रा. डॉ. अमर कांबळे, इचलकरंजी, कोल्हापूर या मान्यवरांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार 2023 देऊन गौरविण्यात आले.अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचार दर्शन या डॉ.अंबादास सकट यांनी लिहिलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने चित्रफीत दाखवण्यात आली.केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत देश अनेक देशांना सहकार्य करत आहे. कोरोना परिस्थितीत औषधे व लसींचा पुरवठा तसेच अन्य संकटकालीन परिस्थितीतही देशाने मदतीचा हात पुढे केला आहे. देशात कौशल्याधिष्ठित युवा पिढी तयार होत असून त्यांना जगभरातून संधी उपलब्ध होत आहेत. आपल्या संविधानाचा सन्मान करणे, प्रत्येकाचे कर्तव्य असून देशाचा विकास साधताना स्त्री शक्तीचा सन्मान होणेही तितकेच महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला शुभेच्छा संदेश
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा संदेश दिला. या शुभेच्छा संदेशात ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा संदेश देत समाजाला योग्य दिशा व सामाजिक भान दिले. सामाजिक समतेचा संदेश व त्यासाठी कार्य करुन लोकशाहीची मुहूर्तमेढ छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात रोवली. याच विचारांनी लोकशाही मार्गाने वाटचाल करत भारत देशाने सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे, असे संदेशात सांगून विवेक विचार मंचचे कार्य महत्वपूर्ण असून समृद्ध समाज घडवण्यात ही राज्य परिषद महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Home Breaking News देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक न्यायाचे विचार अंगी करा : केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार








