बार्टीतर्फे येवल्यात ‘सामाजिक समता सप्ताहाचे’ उद्घाटन

0

येवला : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फ़त महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर दिनांक 7 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, पंचायत समिती येवला व बार्टीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सामाजिक समता सप्ताहाचे उदघाट्न येवला पंचायत समिती येथे मा. गट विकास अधिकारी अन्सार शेख साहेब, विस्तार अधिकारी भगवान बच्छाव, बार्टीचे समतादूत चंद्रकांत इंगळे आईसीडीएस विभागाच्या पर्यवेक्षिका वंदना शिंपी, जिजा शिंदे,सुवर्णा आमले,जयश्रीगवळी
सरला ठोंबरे, उमेदच्या दीपिका जैन मॅडम तसेंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करून उदघाटन करण्यात आले.जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने चंद्रकांत इंगळे यांनी मानसिक आरोग्य, भगवान बच्छाव यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सक्षमीकरण, वंदना शिंपी यांनी आहार आणि महिलांचे आरोग्य यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे उदघाटक शेख साहेब यांनी सामाजिक समता सप्ताहाची रूपरेषा, शासनाचा उद्देश, आपली भूमिका आणि सप्ताहात करावयाच्या उपक्रमाबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित महिलांना सामाजिक न्याय विभागाच्या योजना, ग्रामउद्योग, शासकीय योजना, रमाई घरकुल योजना, अशा योजनाचे माहितीपुस्तक, पत्रके वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान बच्छाव तर आभार चंद्रकांत इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती कार्यालय अधिकारी, आयसीडीएस विभाग,कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या सप्ताहांतर्गत बार्टीच्या समतादूत प्रकल्पमार्फत विविध विषयांवर प्रबोधन कार्यक्रम, 10 तास अभ्यासवर्ग उपक्रम, निबंध,वत्कृत्व, प्रश्न मंजुषा अशा विविध स्पर्धा आयोजन, समता रॅली इ. विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महापुरुषांचे विचार,कार्य आणि भारतासाठी त्यांनी दिलेले योगदान समाजात माहित व्हावे, सामाजिक समतेची बीजे समाजात रुजावी, सामाजिक सलोखा वाढावा यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमात तालुक्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन येवला तालुका समतादूत चंद्रकांत इंगळे यांनी केले आहे. बार्टीच्या या सामाजिक सप्ताह कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here