म्युकरमायकॉसिसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या : आ. सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,कोरोनो नंतर उदभवणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या 43 रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार कोरोनाची लागण होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आढळून येतो आहे. शिवाय या यामध्ये जबडा, डोळे, किडनी या अवयवांना गंभीर दुखापत होत आहे. या आजारावरील उपचार अतिशय महाग आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची काळजी घेणे, त्यांना उपचार देणे व या आजाराविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे, या संदर्भात उपाययोजनांचा एक आराखडा तयार करण्याचे निर्देश माजी अर्थमंत्री व विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले .दिनांक 16 मे रोजी म्युकरमायकोसिस याआजाराविषयी माहिती घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. या आजाराबाबत जनजागृती, पथ्य आणि हा आजार होऊच नये यासाठी उपाययोजना करता येईल काय या विषयी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अविनाश टेकाडे, आय एम ए चे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. सुशील मुंदडा, डॉ प्रवीण घोडे , डॉ. हर्ष मामीडवार, रा. स्व. संघाचे अश्विन जयपूरकर, महानगरपालिका उपाध्यक्ष राहुल पावडे, स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी, सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश धारणे, विशाल निंबाळकर आदी उपस्थित होते.डॉ. मंगेश गुलवाडे यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून सदर आजाराची गंभीरता लक्षात आणून दिली. पुढे बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, म्युकरमायकोसिससाठी आपण आरोग्यमंत्र्यांशी बोलून आवश्यक इंजेक्शन्स 21 दिवस निःशुल्क उपलब्ध होण्यासाठी विनंती केली असून त्यांनी देखील ही विनंती मान्य केली आहे.आजाराविषयी जिल्ह्यात आय एम ए ने पुढाकार घेऊन अद्ययावत सुविधांची आखणी करावी, त्यासाठी शासकीय रुग्णालयात एक स्वतंत्र कक्ष उभारावा, याच बरोबर अतिशय महत्वाचे म्हणजे जनजागृती करण्यात यावी, आजारविषयीचे पथ्य पाळण्यात यावे, आणि आजार होऊच नये यासाठी काही प्रयत्न करता येतील का ते तपासण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे ( ब्लॅक फंगस ) लक्षणे सांगितली. हा आजार ‘म्युकोरेल्स’ फंगसमुळे होतो. चेहऱ्यावर सूज येते. तोंडातून दुर्गंधी येते. हिरड्यांवर फोड येतात. अचानक दात हलतो. सर्दी असणे, नाक बंद होणे, साईनसच्या जागेत दुखणे, नाकातून रक्त येणे, नाक दुखणे , डोळे दुखणे, डोळ्यांना कमी दिसणे, तीव्र डोके दुखणे, मेंदूच्या नसांचा त्रास होणे आदी लक्षणे त्यांनी सांगितली.या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये , औषधोपचारात आपण कुठेही कमी पडणार नाही याची सर्वांनी मिळून दक्षता घेऊ, अशी ग्वाही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री , औषधे व इंजेक्शन्स यांची माहिती त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले , त्या अनुषंगाने आपण शासनाकडे पाठपुरावा करू असेही आ. मुनगंटीवार म्हणाले .या बैठकीला शहरातील नेत्रचिकित्सक, दंतचिकित्सक, इ एन टी तज्ज्ञांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here