कठोर भुमीका, कारवाई व अंमलबजावणी शिवाय कोरोना नियंत्रणात येणार नाही- कृषी मंत्री दादाजी भुसे

0

मालेगाव – मंत्री भुसे यांनी दिले प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश,गेल्या दोन दिवसापासून कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी गतवर्षीच्या तुलनेत मृत्यूदर वाढला आहे. कोरोनाच्या महामारीत आपण चांगली माणसे गमावली असून ही महामारी रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कठोर भुमीका, कारवाई व अंमलबजावणी केल्याशिवाय कोरोना नियंत्रणात येणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील संशयीत व बाधित रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणास विरोध केल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.मालेगांव शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली, याप्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते.तालुक्यात सुरवातील कोरोनाच्या हॉटस्पॉट असलेल्या 38 गावांची संख्या कमी होवून आज 19 वर आल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, या 19 गावातील ज्या ग्रामदक्षता समित्या आहेत त्यातील तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी विशेष परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. या गावातील संशयित रुग्ण गावभर फिरणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच बाधित रुग्णाच्या घराची प्रत्यक्ष पडताळणी करून गरजेनुसार त्यास संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. त्याने विरोध केल्यास त्यास थेट मालेगाव येथील कोवीड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात यावे. अशा रुग्णांकडून विलगीकरणासाठी प्रतिसाद न मिळाल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.शहरातील रुग्ण संख्या नियंत्रीत ठेवण्यासाठी छोटी प्रतिबंधी क्षेत्र (मायक्रो कंटेटमेंट झोन) तयार केल्यास नागरिकांची गैरसोय टाळण्यासह अशा प्रतिबंधीत क्षेत्रात सेवा सुविधा देण्यासही मदत होणार असल्याचे मंत्री श्री.भुसे यावेळी म्हणाले, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याची खंत व्यक्त करत शहरी भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here