मुंबई – जागतिक साहित्याच्या तुलनेत मराठी साहित्याची तुलना करणं सोपं नाही. याचे कारण सगळ्या जगाची भाषा मराठी असती तर इंग्लंडमधल्या नव्हे तर फ्रेंच, रशियन, अमेरिकेतल्या मराठी पुस्तकांची महाराष्ट्रातील मराठी पुस्तकांशी तुलना करता आली असती. किंवा सर्व जगाची भाषा इंग्रजी असती तर इंग्रजीतल्या साहित्याशी तुलना आपल्याशी करता आली असती असे मत ग्रंथसखा शशिकांत सावंत यांनी दादर येथे व्यक्त केले. दादर सार्वजनिक वाचनालय, धुरु हॉल ट्रस्ट आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमा प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे, दासावाच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती शुभा दत्ता कामथे, राजन भालिंगे, सुरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवियित्री शांताबाई शेळके यांचे साहित्य आणि कर्तृत्व यावर प्रा हेमंत सामंत यांनी विचार मांडले. संघाचे माजी अध्यक्ष विजय ना कदम आणि श्रीनिवास डोंगरे यांना कोरोना विषयावर पत्रलेखन केल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दासावाचे कार्यवाह यतीन कामथे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख ग्रंथपाल अश्विनी पाठक, सर्व सेवकवर्ग, राष्ट्रकूट मासिकाचे कार्यकारी संपादक राजन देसाई, प्रशांत भाटकर यांनी विषेश मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर साळवी यांनी तर आभार प्रदर्शन अरुण खटावकर यांनी केले. जागतिक साहित्याच्या तुलनेत मराठी भाषा या विषयावर
जगभरातील काही श्रेष्ठ साहित्यिक – कलावंतांची तुलना करत हा विषय सावंत यांनी अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडला. ते पुढे असेही म्हणाले की, भारतात शेकडो भाषा आहेत. अगदी महाराष्ट्रात मालवणी पासून ते इराणी पर्यंत इतक्या बोलीभाषा आहेत व त्यांचे साहित्य एका विशिष्ट मराठी भाषेत तयार होतं. आपल्याला श्रेष्ठ साहित्याची परंपरा आहे ती तुकाराम ज्ञानेश्वरांपासून ते नवकथेचे प्रवर्तक गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे,मोकाशी इथपासून ते किंचित पुढची पिढी ज्याच्यात भालचंद्र नेमाडे, अरुण कोल्हटकर, चित्रे ,नामदेव ढसाळ, खानोलकर यांसारखे खणखणीत कवी निर्माण झाले. त्यानंतरच्या साहित्यात अगदी आतापर्यंत बालाजी सुतार किंवा प्रणव सुखदेव यांसारख्या नव्या लेखकांचे साहित्यही कसदार आहे आणि त्याला चांगला वाचकवर्गही आहे. पण दोन तीन गोष्टी यात आहेत एक म्हणजे साहित्य जरी चांगलं असलं तरीही त्याचं उत्तम अनुवाद इंग्रजीत व्हायला हवेत, बनगरवाडी पासून ते कोसला पर्यंत अनेक पुस्तकांचा इंग्रजीत अनुवाद झाला आहे. मात्र ज्याप्रकारे मारक्वेन्स चे अनुवादक दिवस-रात्र केवळ तेच काम करतात त्यामुळे मारक्वेन्स, मिलन कुंदेरा यांच्यासारख्या लेखकांचे अनुवाद वाचताना ते त्यांनीच लिहिले आहेत असे वाटतात.