इंडियन हायस्कूलच्या सुवर्णमुद्रा मुद्रा

0

मनमाड  ( हर्षद गद्रे ) शाळेच्या 98 वर्षाच्या प्रवासात या विद्यालयात शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे नाव आपल्या स्वकर्तृत्वाने मोठे केले. अशा विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वाचा परिचय करून देण्याचा मी अल्पसा प्रयत्न सुरू केला आहे.
या मालिकेतील दुसरी कर्तुत्ववान विद्यार्थिनी आहे सौ दीपा सुरेश पाटील अर्थात पूर्वाश्रमीची दिपा प्रभाकर थत्ते 1987 च्या एस एस सी बॅच मधली एक हूशार विद्यार्थीनी असा तिचा नावलौकिक आपणा सर्वांनाच माहिती आहे. शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य रुजविण्यात मोठा हातभार असलेल्या कै. प्रभाकरपंत थत्ते (बाबा) व राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या श्रीमती सुनंदाताई थत्ते या दांपत्याची दीपा ही कन्या. घरातच संघाचे वातावरण असल्याने संघ विचाराचे बाळकडू तिला जन्मजातच मिळाले. तल्लख बुद्धी व संवेदन शिलतेची जोड मिळालेल्या दीपाला 87 च्या एसएससी परीक्षेत उत्तम गुण मिळाले. उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षण घेण्यासाठी तीने जळगाव येथील एम जे कॉलेज मध्ये हे प्रवेश घेतला, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटी मधून फिजिक्स विषयातून बी एस सी ची पदवी मिळवली. मोठ्या शहरात शिक्षण घेत असतानाच शिक्षणाबरोबरच समाजातील वेदनांची तिला जाणीव होऊ लागली.
बीएस्सी नंतर तिच्यातला स्वयंसेवक तिला स्वस्थ बसू देत नव्हता. वनवासी कल्याण आश्रमाच्या गुहि येथील शाळेत दोन वर्ष पूर्णवेळ काम बघण्यास तिने सुरुवात केली, यात प्रामुख्याने प्रौढ साक्षरता वर्ग घेणे, आदिवासी भागात आरोग्य विषयक जनजागृती करणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल समुपदेशन करणे, अशी कामे तिने दोन वर्ष केली. या दोन वर्षातील कामामुळे तिला भरपूर शिकायला देखील मिळाले समाजसेवा करत असताना येणाऱ्या अडचणी व त्या सोडविण्याचे मार्ग शोधण्यासाठीची चिकित्सक वृत्ती व वैचारिक बैठक तिथेच तयार झाली.
संघाचे सहा वर्षे बीड, राजुर, गांधीनगर, येथे प्रचारक असलेल्या सुरेश पाटील या पेशाने फार्मसिस्ट असलेल्या तरुणाशी तिचा विवाह झाला. माहेर व सासर दोघेही संघमय असल्याने तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. लग्नानंतर एक-दोन वर्षे गृहिणी म्हणून काढत असतानाच तिचे पती जनकल्याण समिती मार्फत चालविल्या जाणाऱ्या भारत माता प्रकल्पाचे काम बघत होते.
1992 सालच्या लातूर भूकंपानंतर जनकल्याण समितीने धाराशिव व लातूर जिल्ह्यात भारत माता प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत 20 ठिकाणी भारत माता मंदिरे उभारण्यात आली असून या मंदिरात बालवाडी, संस्कार वर्ग, महिला सबलीकरण, विवेकानंद हॉस्पिटलचे रुग्णालये चालविली जातात . भूकंपानंतर तेथील नागरिकांच्या जीवनाला आकार देण्याचे काम या मार्फत केले जाते. या प्रकल्पात साठी श्री सुरेश पाटील पूर्णवेळ काम करू लागले . लातूर जवळील हरंगुळ येथे भूकंपानंतर सुरू झालेल्या जनकल्याण निवासी विद्यालयाचे अधीक्षक म्हणून सुरेश पाटील हे काम बघू लागले. स्वाभाविकच दीपा देखील या कार्यात स्वयंस्फूर्तीने शिक्षिका म्हणून सहभागी झाली. हे निवासी विद्यालय असल्याने वसतिगृहातील सुमारे 500 विद्यार्थी व विद्यार्थिनिं वर संस्कार करण्याची जबाबदारी तिने अतिशय उत्तम रितीने पार पाडली.
मिथिलेशच्या जन्मा नंतर तिच्यावरील जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. लातूरमध्ये रा स्व संघ जनकल्याण समिती पुणे ह्यांच्या मार्फत संवेदना ह्या बहुविकलांगां साठीच्या शाळेची जवबदारी स्विकारली . वृत्तीत प्रामाणिकपणा, समाजासाठी संघर्ष करण्याची तयारी, तळमळ असे गुण असले तर समाजाकडून सहकार्य मिळण्यात फारशा अडचणी येत नाही ही याचा प्रत्यय दीपाला देखील आला. लातूर येथे विवेकानंद हॉस्पिटलच्या परिसरात या शाळेची मुहूर्तमेढ 2006 सालि रोवली गेली. विवेकानंद हॉस्पिटल हे पद्म पुरस्कार विजेते सेवाव्रती डॉ. कुकडे यांच्या कार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असे रुग्णालय आहे. शाळा सुरू करण्याची पूर्व तयारी तिने आधीच सुरू केली होती, विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन देता यावे यासाठी दीपाने मुंबईतील स्प्यासफिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमधून एक वर्षाची विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी चा बीएड अभ्यासक्रम उत्तम गुणांनी उत्तीर्ण केला. यासाठी तिला एक वर्ष मुंबईत वास्तव्य करून राहावे लागले. तिने सोशलॉजी विषयातून स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड़ येथून एम ए पदव्युत्तर पदवी देखील मिळवली. सेवाकार्य सोबत ज्ञानार्जन देखील सुरुवात होते.
शाळा सुरू झाल्यानंतर अनेक अडचणींना तिला सामोरे जावे लागले अनेक पालक आपल्या पाल्यांना अशा शाळेत पाठविण्यास तयार नसतात, यासाठी पालकांचे समुपदेशन व प्रबोधन करण्यापासूनच्या सर्व जबाबदाऱ्या तिला पार पाडाव्या लागल्या. दीपाची मेहनत व प्रामाणिकपणा, सचोटी आणि तळमळ यामुळे शाळेचे नाव अल्पावधीतच पंचक्रोशीत नावारूपाला आले. पालक स्वयंप्रेरणेने पाल्यांना शाळेत दाखल करू लागले. दीपाच्या कार्याची पहिली दखल शाळा सुरू झाल्यानंतर 9 वर्षाने केंद्र सरकारच्या दिल्ली स्थित नॅशनल ट्रस्टने उत्कृष्ट पालक म्हणून दीपाला सन्मानचिन्ह देऊन दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर तिचा 2015 सालि सन्मान केला.
2016 हे वर्ष दीपा साठी विशेष ठरले या विद्यालयाची मुख्याध्यापिका म्हणून दीपा काम करू लागली व विद्यालयाला जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने 3 डिसेंबर 2016 मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दोन लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित झालेली दीपा ही आपल्या विद्यालयातील पहिलीच विद्यार्थिनी असावी.
दीपाच्या व रा.स्व.संघ जनकल्याण समिती पुणे द्वारा स्थापित संवेदना संस्थेच्या कार्याची दखल इंग्लंडमधील संस्थेने घेतली, इंग्लंड स्थित भारतीय नागरिकांच्या सेवा युके या संस्थेने दीपाच्या शाळेसाठी दोन कोटी रुपयांचा निधी संवेदना प्रकल्पाच्या इमारतीचे बांधकाम करण्या साठी देणगी म्हणून दिला. 2017 सालि लातूर पासून जवळच असलेल्या हरंगुळ या गावी स्वतःच्या इमारतीत शाळा काम करू लागली. आज या शाळेत साठ बहुविकलांग विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. डे स्कूल असे स्वरूप असलेल्या या शाळेच्या स्वतःच्या बसेस आहेत. विषेश म्हणजे हे सर्व शिक्षण मोफत दिले जाते, कोणत्याही पालका कडुन फी घेतली जात नाही.वहातूक व्यवस्थेचा नाम मात्र खर्च देखील ज्या पालकाना देणे परवडते अशांकडूनच घेतला जातो. बकुळाताई देवकुळे ट्रस्ट ठाणे यांच्या वतीने समाजसेवेसाठी तिचा राज्यपातळीवर सन्मान करण्यात आला.
संवेदना या बहुविकलांगां साठीच्या शाळेबरोबरच लातूर येथे जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र शाळेमार्फत चालवले जाते. या केंद्रामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना व विद्यार्थ्यांना समुपदेशन मार्गदर्शन व आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न केला जातो, याचा लातूर जिल्ह्यातील असंख्य दिव्यांगांना लाभ लाभ झाला आहे. 1992 च्या भूकंपामुळे प्रसिद्ध झालेल्या किल्लारी गावाजवळील नदीहत्तरगा गावात संवेदना संस्थेच्यावतीने घरोंदा नावाचा प्रकल्प चालविला जात असून या प्रकल्पात 18 वर्षे वयावरील मतिमंद मुलांची निवासी शाळा चालविली जाते. या शाळेची स्वतःची शेतजमीन असून या मतिमंद मुलांना कागदकाम, द्रोण बनवणे अशा उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते.सवेदना प्रकल्पा अंतर्गत चालत असलेले विविध सेवा प्रकल्प हे जनकल्याण समिती मार्फत लोकाश्रयाच्या जोरावरच चालतात .
दीपाच्या शाळेविषयी व कार्याविषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास फेसबुक वरील संवेदना केंद्राच्या samvedanalatur या पेजला ,अथवा www.sanvedana.com ह्या वेब साइटला भेट देऊन आपण अधिक माहिती घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here