कोरोनामुक्तीकडे एक पाऊल

0

श्रीरामपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना सप्रेम नमस्कार !! मी तहसीलदार श्रीरामपूर,आपल्या सर्वांना तालुक्यातील कोरोना बाबतची आजची स्थिती सांगू इच्छित आहे. आज दिनांक 29 जुलै रोजी तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 187 झाली असून यापैकी 115 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, 66 रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत तर दुर्दैवाने 6 रुग्ण दगावले आहेत. या 6 रुग्णांपैकी 4 रुग्ण खूप उशिराने दवाखान्यापर्यंत पोहोचल्यानंतर काही तासांत मयत झाले आहेत,जवळपास सर्वत्र अशीच परिस्थिती आहे.मी यापूर्वी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्या तालुक्यात शिरसगाव येथील डॉ.आंबेडकर वसतीगृह या कोरोना केअर सेंटर येथे संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात व सदर नमुने नगर येथे पाठवले जातात. या चाचण्यांचे परिणाम येण्यात काही कालावधी लागत असल्याने मा.जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांनी आपल्याला रॅपिड अँटिजेन टेस्ट ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या टेस्टमुळे काही मिनिटात आपल्याला कोरोना झाला आहे किंवा नाही हे कळते. या टेस्टचा वापर प्रामुख्याने ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळून आले आहेत अशा ठिकाणी केला जात आहे. टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना उपचारासाठी सेंट लूक म्हणजेच जर्मन हॉस्पिटल येथे भरती केले जात आहे. आजपर्यंत या ठिकाणाहून 110 रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे,इतक्या लोकांना काहीच न होता ते बरे झाले हा संदेश आपल्या सगळ्यांच्या मनातील भीती दूर करणारा आहे, असे असले तरी दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काही सांगावेसे वाटत आहे. मयत झालेल्या व्यक्ती वयस्क होत्या, आधीपासूनच वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त होत्या असे असले आणि व्हाट्सअपवरचे आपल्याला बिनधास्त करणारे, कोरोनाने काही होत नाही,कोरोना थोतांड आहे असे काही मेसेज कोरोनाची भीती कमी करण्याचे काम करत असले तरी आपण गाफील तर होत नाहीत ना? असा प्रश्न पडावा अशी वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडत आहे. तालुकास्तरावर आपल्याकडे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात, अचानक रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी झाली व त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली तर त्यासाठी त्याला तात्काळ नगर येथे हलवणे आवश्यक असते. कारण पुढचे उपचार अजून तरी आपल्याकडे उपलब्ध नाहीत. अशा रुग्णाला येथून हलवण्यापूर्वी नगर येथील रुग्णालयात आधीच खूप रुग्ण असल्याने बेड उपलब्ध आहे का? 108 अंबुलन्स कॉल करून बोलवावी लागत असल्याने तिला लागणारा किमान वेळ याचा आणि इतर गोष्टींचा विचार केला तर आपल्याला या आजाराचे गांभीर्य लक्षात येईल. 95% लोकांना हा आजार सर्दीसारखा किरकोळ जाणवत असला तरी संकटात सापडणाऱ्या 5% मध्ये आपण येणार नाहीच याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही.आपला बिनधास्तपणा विषाची परीक्षा ठरू शकतो याची प्रचिती आणून देणारे अनपेक्षित मृत्यू आपण नक्कीच ऐकले असतील. कोरोना बधितांची संख्या वाढतच जाणार आहे हे सर्वमान्य आहे मात्र आजवर झालेले मृत्यू पाहिले तर ते टळू शकले असते असा माझा ठाम समज आहे. योगा, व्यायाम,चांगला आहार, काढे व इतर अनेक उपाय नक्कीच महत्वाचे आहेत मात्र यासोबत एक उपाययोजना मला तुम्हाला सांगायची आहे. मी प्रत्येक गावात स्थापन केलेल्या ग्राम कोरोना समितीला पत्र देऊन काही सूचना दिलेल्या आहेत. सरपंच या समितीचे अध्यक्ष असून पोलीस पाटील,तलाठी, ग्रामसेवक सदस्य आहेत. समितीने गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवणे, त्यांना काही काळ इतरांपासून वेगळे ठेवणे, गावात लग्न समारंभ असतील तर ते कमीत कमी उपस्थितीत पार पडतील असे पाहणे अपेक्षित आहे. समिती सदस्यांनी पुढाकार घेऊन गावातल्या 55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींच्या व विशेषतः ज्यांना दमा,मधुमेह,कॅन्सर, हृदयाचे,फुफुसाचे, किडनीचे व इतर गंभीर आजार आहेत अशा व्यक्तींच्या याद्या तयार कराव्यात, या यादीतल्या लोकांची स्थानिक आरोग्य अधिकारी,आशा सेविका यांच्या मदतीने नियमितपणे म्हणजे किमान दिवसाआड ताप,ऑक्सिजन पातळी सारख्या तपासण्या करून घ्याव्या व अशा सर्व व्यक्तींवर लक्ष ठेवणेबाबत गावातील घराघरात जागरूकता निर्माण करावी. श्वास घेण्यास त्रास होणे,ताप येणे अशी लक्षणे आढळून आल्यास अशा व्यक्तींची तात्काळ आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने रॅपिड कोरोना टेस्ट करून घ्यावी. शहराबद्दल बोलायच झालं तर श्रीरामपूर शहराची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे, शहरात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला पदाधिकाऱ्यांचा,पत्रकार बांधवांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. सर्व सन्मानीय नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील वयस्क,गंभीर आजार,धोका असलेल्या लोकांच्या याद्या तयार करून लक्षणांच्या व गरज वाटल्यास कोरोनाच्या तपासण्या करून घेण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे व आपल्या प्रभागाचे पालकत्व स्वीकारावे अशी विनंती करण्यात येत आहे . काही जणांनी चाचणीसाठी नमुना दिल्यावर घरी जाण्याचा धरलेला हट्ट व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे होम क्वारणटाईन केलेले असतांना बाहेर फिरल्याचे व नन्तर पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे,अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असले तरी तोवर समाजाचे नुकसान झालेले असते याचे भान ठेवण्याची गरज आहे.इतकेच नव्हे तर कोरोना चाचणीचे परिणाम येइपर्यंत अशा व्यक्तींनी स्वतःला घरातील इतरांपासून सुद्धा दूर ठेवण्याचा समजदारपणा दाखवावा.असे केल्यास कोरोनाचे वेळेवर निदान होऊन आपल्या घरातील ज्येष्ठ किंवा आजारी व्यक्ती ज्या पुढे अनेक वर्षे सहज जगू शकणार आहेत त्यांचे दुर्दैवी मृत्यू पाहण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. आपल्या तालुक्यात झालेले काही मृत्यू माझ्याच मनाला चटका लावून गेले आहेत, तर त्यांच्या कुटुंबायांची काय अवस्था असेल? आपल्या घरातील म्हातारी माणसं किंवा आपली जीवाभावाची माणसं कोरोनाच्या भीतीने किंवा नाईलाजाने दवाखान्यात एकटी सोडून दिल्यावर त्यांची आणि कुटुंबाची काय अवस्था होत असेल याची नुसती कल्पना सुद्धा अंतःकरण पिळवटून टाकते. आपण हे सगळं टाळू शकतो का? उत्तर आहे.. हो !! आपण हे टाळू शकतो निदान लांबवू तरी शकतो. रुग्ण आढळला की प्रशासन कंटेन्मेंट झोन जाहीर करते, त्यावर काही लोक राजकारण करतात, काही विरोध करतात,काही बांबू मोडून, पत्रे वाकवून बाहेर फिरण्यातच मोठेपणा मानतात. मागे एकाने मला फोन केला, साहेब,आमच्या खालच्या मजल्यावर पेशंट सापडला आहे,आम्हाला अडचण नाही ना बाहेर जायला यायला? कंटेन्मेंट झोन करण्यामागे त्या भागातला विषाणू तिथेच संपुष्टात यावा व साखळी तुटावी हा असतो मात्र आपण त्याला बाहेर जाऊन इतरांना वाटण्यात अथवा त्याला घरी घेऊन येण्यालाच कंटेन्मेंट समजत आहोत. रोज 20-25 रुग्ण सापडत असतांना प्रशासन किती ठिकाणी पत्रे,बांबू लावेल,आणी रखवालदार नेमेल यालादेखील मर्यादा आहेत. मुळात प्रतिबंध लादून उपयोग नसतो,तो मनातून यायला हवा. मित्रहो,अजूनही वेळ गेलेली नाही, आपली नाजूक प्रकृतीची माणसे जपा, त्यांच्या तब्बेतीकडे बारीक लक्ष ठेवा, लवकर चाचणी करून उपचार सुरू करा, जीवन अमूल्य आहे, गेलेली माणसं परत येत नाहीत, कोरोना रुग्णांचे आकडे मोजू नका,आकडे वाढणारच आहेत,घाबरून तर मुळीच जाऊ नका !! मात्र गाफीलदेखील राहू नका.फक्त पथ्य पाळा !! काही आजार औषधाने नव्हे तर केवळ पथ्य पाळल्याने दूर राहतात किंवा लवकर बरे होतात !! तालुक्यातील सर्व बंधू भगिनींना कोरोना मुक्तीसाठी हार्दिक शुभेच्छा !!💐💐💐
✍🏻 *प्रशांत पाटील, तहसिलदार,श्रीरामपूर*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here