नागपूर, दि.17 : वने, भूकंप व पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी नागपूर वनविभागाचे सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरला भेट दिली. यावेळी रामटेकचे आमदार ॲड. अशिष जयस्वाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॉ.एन. रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान व धोरण) एम.के. राव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ठ वनोपज) टी. के. चौबे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक डॉ. प्रभू नाथ शुक्ल, सहाय्यक वनसंरक्षक एस.बी. गिरी, सहाय्यक वनसंरक्षक एस. टी. काळे, व राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य श्री. कुंदन उपस्थित होते.
वनमंत्री महोदयांनी ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरचे बचाव तुकडी, कंट्रोल रुम व श्वान पथकाच्या कार्याची माहिती घेतली. तसेच वन्यजीवांच्या उपचाराकरीता उपलब्ध सोई-सुविधा जसे एक्स-रे मशिन, ऑपरेशन थिएटर, पक्ष्यांकरीता उष्मायन आदींची पाहणी केली. यावेळी कोविड-2019 कालावधीत केंद्राने केलेल्या अथक परिश्रमाची दखल घेवून केंद्राला वनमंत्री महोदयांचे हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.
सन 2014-15 पासून ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरव्दारे 4 हजार पेक्षा अधिक वन्यप्राणी व पक्ष्यांचे बचाव, उपचार करुन नैसर्गिक अधिवासामध्ये सुटका केली असल्याची बाब यावेळी वनाधिकाऱ्यांकडून वनमंत्री महोदयांचे निदर्शनास आणून देण्यात आली. ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे साप पकडणे असून आतापर्यंत, 1600 पेक्षा जास्त सापांना पकडून त्यांचा जिव वाचविण्यात आले आहे आणि त्यापैकी बऱ्याच क्षतीग्रस्त सापांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना वनात सोडण्यात आल्याचे सुध्दा सांगण्यात आले. वसंत पंचमीच्या (संक्रातीमध्ये) वेळी नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या शंभरपेक्षा जास्त पक्ष्यांवर उपचार करुन त्यांना निसर्ग मुक्त करण्यात आल्याचे सुध्दा यावेळी सांगण्यात आले.
केंद्राव्दारे सुरु असलेल्या कार्याचे मा. वनमंत्री महोदयांनी कौतुक केले आणि ते म्हणाले की, आजस्थितीत बऱ्याच कारणांमुळे मानव-वन्यजीव संघर्षात वाढ होत असतांना, ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण आहे. तसेच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना अधिक असणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये असे केंद्र सुरु करायला हवे असे मत व्यक्त केले. यावेळी वनमंत्री महोदयांनी ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरला नियमितपणे रोख किंवा वस्तूस्वरुपात भेट देणाऱ्या काही जागरुक नागरिकांचा प्रमाणपत्र देवून सन्मान केले. तसेच वन्यजीवांप्रती अशीच आत्मियतेची भावना सर्वांमध्ये निर्माण होईल अशी अशा व्यक्त केली.