मनमाड -( श्री हर्षद गद्रे सर ) उद्या तीन जुलै आपल्या सर्वांच्याच जीवनातील माइलस्टोन ठरलेल्या आपल्या मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा अर्थात आपल्या शाळेचा वर्धापनदिन . 98 वर्ष पूर्ण करून 99 व्या वर्षात आपली शाळा पदार्पण करत आहे. यानिमित्ताने या ग्रुप वरील सर्व सदस्यांना, शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना, शाळेच्या आजी व माजी शिक्षकांना वर्धापन दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.
98 वर्षाच्या प्रवासात विद्यालयाने हजारो विद्यार्थी घडवण्याचे काम केले. 1922 सालि मनमाडची लोकसंख्या जेमतेम दहा-पंधरा हजार होती, त्या काळात सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली एकच संस्था मनमाड अस्तित्वात होती ती म्हणजे आत्ताचे सार्वजनिक वाचनालय ,पूर्वी हे वाचनालय गांधी वाचनालय म्हणून ओळखले जात असे. अशा या काळात ब्रिटिश अमदानीत शाळा सुरू करण्याची की धडपड ज्या ऋषितुल्य व्यक्तीमत्वाने केली त्या कै. रावसाहेब सप्रे यांचे या विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांवर नव्हे तर समस्त मनमाडकरांवर अगणित असे उपकार आहेत. आजच्या दिवशी त्यांच्या कार्याचे स्मरण करणे उचित ठरेल.
रेल्वेत ड्राफ्ट्समन म्हणून नोकरीत असलेले रावसाहेब हे तत्कालीन व्हीजेटीआय या अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. त्या काळातील रेल्वेच्या पुलांचे व रेल्वेच्या इमारतींवर उभारलेल्या कमानींचे डिझाईन त्यांनी केले आहे. आर्च नावाचा स्थापत्यशास्त्रात प्रकार असतो त्याचे डिझाइन करण्यात त्यांचा हातखंडा होता. अशा या व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची, शाळेची जडणघडण झाली. शाळेला ब्रिटिश सरकारने मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले अर्थात ही त्यांची गरज होती. रेल्वे कारखान्याच्या निमित्ताने पर गावातुन शेकडो नागरिक मनमाड येथे वास्तव्यास आले होते व त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची सोय करणे ही निकड रेल्वेला होती. अशा परिस्थितीत विद्यालय बाळसे धरू लागले.
1930 साली तत्कालीन रेल्वेचे जनरल मॅनेजर यांनी मनमाडला भेट दिली व या भेटीत त्यांनी शाळेची पाहणी केली, पाहणी केल्यानंतर त्यांनी दिलेला मी बघितलेली “भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था” असा आपल्या शाळेचा उल्लेख केलेला अहवाल आजही शाळेच्या दप्तरात बघावयास मिळतो. शाळेचा दर्जा व गुणवत्ता सर्वोत्कृष्ट होती, म्हणून तर ब्रिटिश अमदानीत विंदा करंदीकरां सारख्या ज्येष्ठ साहित्यिकाला या विद्यालयात नोकरी करण्याचा मोह झाला. एवढेच काय सुस्थितीतील आपला वकिलीचा व्यवसाय असताना तो सोडून आपल्या शाळेचे प्राचार्यपद कै. केतकरसरांनी भूषविले केतकर सरांचा काळ हा शाळेचा सुवर्णयुग मानले जातो. या काळात शाळेचा उल्लेख नाशिक जिल्ह्यातील ऑक्सफर्ड असा केला जायचा. केतकर सरांचे प्रशासनावर असलेले नियंत्रण व विद्यार्थ्यांना बद्दल असलेली तळमळ आणि आत्मीयता फार क्वचितच बघायला मिळते. त्याकाळात शिक्षकांचे पगार संचालक मंडळामार्फत होत असत, राज्यातील अनेक शाळात शिक्षकांना दर महिन्याला वेतन मिळत नसे, अशा काळात दर महिन्याच्या एक तारखेला वेतन देणार्या राज्यात बोटावर मोजता येईल इतक्या शाळा होत्या त्यामध्ये आपली शाळा होती यावरून केतकर सरांच्या कार्याची आपणा सर्वांनाच कल्पना येईल. तुटपुंजा वेतनात देखील तत्कालीन शिक्षकांनी शाळेचा नावलौकिक उंचविण्यासाठी केलेली धडपड खरोखरीच अविस्मरणीय अशी आहे .
गेल्या दोन-तीन वर्षांपासून शाळेचे रेकॉर्ड वाचण्याची या ना त्या कारणाने संधी आली त्यावेळेस तत्कालीन कार्यपद्धती जवळून अभ्यासायला मिळाली. 1975 च्या आसपास महाराष्ट्र शासनाने 10 +2+3 हा शैक्षणिक पॅटर्न निवडला. विद्यालयाला विज्ञान व वाणिज्य शाखेचे अकरावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळाली.वानिज्य शाखेचे वर्ग काही काळ विद्यालयाने चालवले देखील पण त्यानंतर हे वर्ग बंद करण्यात आले का बंद केले याचे कागदोपत्री तरी काही कारण मला दिसले नाही.
शास्त्र विभाग मात्र तेव्हापासून सुरू आहे आणि शास्त्र विभागाची गुणवत्ता शहरात सर्वोत्कृष्ट अशी आहे. याच काळात विद्यालयाला इंग्रजी माध्यमाचे आठवी, नववी, दहावीचेचे वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळाली, परवानगी मिळाली म्हणण्यापेक्षा आपल्या विद्यालयाने हे वर्ग सुरू करावेत अशी शासनानेच अपेक्षा व्यक्त केली. आपण हे वर्ग सुरू केले आज महाराष्ट्रात सरकारी अनुदान असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अतिशय थोड्या शाळा आहेत त्यापैकी एक शाळा आपली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. नवीन तुकड्या सुरु करणे क्रमप्राप्त झाले प्रवेशासाठी पहाटेपासून रांगा लागल्याचे दृश्य बघितलेले अनेक मनमाडकर आहेत.
विद्यालयाने आपली प्राथमिक शाळा देखील सुरू केली. ही शाळा सुरु करण्यास काहीसा उशीर झाला, दहा वर्ष आधी ही शाळा सुरु केली असती तर आज विद्यार्थ्यांची उणीव शाळेला भासते आहे ती कदाचित भासली नसती. असो जे झाले ते झाले त्यावर आता भाष्य करणे उचित नाही. प्राथमिक शाळेची प्रगती उत्तम आहे, या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला आहे. प्राथमिक शाळेच्या जडणघडणीत नुकतेच निर्वातलेले विद्यालयाचे ज्येष्ठ संचालक शहरातील नावाजलेले धन्वंतरी कै. डॉ. सी एच बागरेचा यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.
आपल्या शाळेच्या वैभवात भर घालणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करणे येथे क्रमप्राप्त ठरेल . पहिली बाब म्हणजे आपल्या विद्यालयाचे लोकमान्य सभागृह ,विद्यालयाच्या गेल्या या साठ वर्षातील प्रवासाचा साक्षीदार असलेला लोकमान्य हॉल हा महाराष्ट्रातील मोजक्या सभागृहांत पैकी आहे .की ज्या सभागृहात राज्यातील नामवंत साहित्यिक, गायक, विचारवंत, समाजसेवक, शास्त्रज्ञ, आदींनी हजेरी लावली आहे. या सभागृहाच्या भिंतींनी कान लावल्यास पु भा भावे, नरहर कुरुंदकर ,यशवंत देव ,गिरिजा कीर, शांता शेळके, अण्णा हजारे, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, श्याम मानव, म सु पाटील, यशवंत पाठक, यासारख्या विचारवंतांचे विचार आज देखील ऐकू येतील. शहरातील सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू असलेला लोकमान्य हॉल शहराच्या शहराचे भूषण समजला जातो. सार्वजनिक वाचनालयाची वकृत्व स्पर्धा, विकास काकडे यांच्याद्वारे आयोजित केली जाणारी वाद विवाद स्पर्धा याच सभागृहात होत असे. या स्पर्धात भाग घेतलेल्या अनेक स्पर्धकांनी पुढे राज्यपातळीवर आपला नावलौकिक मिळवला आहे. आपल्या शाळेचे वाचनालय अतिशय समृद्ध असे आहे, माझ्या कल्पनेनुसार एवढा प्रचंड पुस्तक संग्रह जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांत देखील नसावा. शाळेच्या वैभवात भर घालणारे एक ठिकाण म्हणजे शाळेची प्रयोगशाळा, सुसज्ज अशी प्रयोगशाळा आपल्या विद्यालयाला लाभली आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून शाळा एका संकटातून जात आहे. यावर मात करण्यासाठी व यातून बाहेर येण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न चालू आहेत . लवकरच काहीतरी चांगले होईल अशी आजच्या या मंगलदिनी ईश्वराकडे प्रार्थना करू या. अर्थात शंभर टक्के चांगलेच होणार कारण 98 वर्षाच्या प्रवासात आपल्या शाळेने हजारो विद्यार्थी घडवले आहेत, हजारोंच्या जीवनात प्रकाश पेरण्याचे काम शाळेने केले आहे. या सर्वांच्या शुभेच्छा निश्चितच कामाला येतील यात शंका नाही.
सदर लिखाण मी माझ्या कुवतीनुसार व माहितीनुसार केले आहे यात निश्चित काही उणीवा राहिल्या असतील, चुका देखील झाल्या असतील, त्याबद्दल आधीच सर्वांची माफी मागतो. आपल्याकडे देखील शाळेबद्दलच्या भरपूर आठवणी असतील, आजच्या या दिवसानिमित्त आपण देखील शेअर कराव्यात हीच अपेक्षा.
ता.क. उद्या तीन जुलै रोजी सकाळी दहा वाजता छोटेखानी स्वरूपात शाळेचा वर्धापन दिन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून साजरा करणार आहोत. धन्यवाद.