मनमाड – प्रतिनिधी- हर्षद गद्रे,- दरवर्षी लाखो वारकरी ज्या वारीची वाट बघतात ती म्हणजेच पंढरीची वारी , वर्षातून आषाढी आणि कार्तिकी एकादकशीला लाखो वारकरी हे पंढरीच्या वारीला जात असतात.पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचा उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या घराण्यात पंढरीची वारी होत होती. त्यांचे वडील वरीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.
ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे संत एकनाथ महाराज , संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही संत ज्ञानेदव यांच्या पूर्वकालीन प्रथा आहे. वारकरी हे नाव वारीमुळे पडलेले आहे. वारीची परंपरा ही सर्वच संतांनी जतन केलेली आहे. आज च्या काळात देखील लाखो वारकरी हे हजारो किलोमीटरचा प्रवास पायी चालून पांडुरंगाची वारी पूर्ण करतात यांच्या मध्ये अनेक जातींचे , लहान ,मोठे , स्त्री, पुरुष असतात.वारी म्हणजे एक सुखद आणि आनंदी अनुभव देणारा क्षण असतो .
या वर्षी मात्र इतिहासात कधीही खंड न पडलेल्या वारीला कोरोना विषाणूच्या प्रसार मुळे अनेक वारकऱ्यांच्या वारीचा खंड झाला, फक्त काही प्रमुख पालख्या आणि पादुकांनाच बस द्वारे पंढरीच्या भेटीला घेऊन जाण्याची परवानगी मिळाली.
मनमाड शहरातून देखील संत श्रेष्ठ कैकाडी महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचे गेल्या अनेक वर्षापासून आयोजन केले जाते. रामदास महाराज हे या मनमाड मधून निघणाऱ्या दिंडीचे मुख्य प्रवर्तक असतात. सुमारे पाच ते सहा हजार वारकरी या दिंडी मधून नित्यनियमाने पंढरपूरला जात असतात. पंचक्रोशीतील भाविकात ही दिंडी गेल्या कैक वर्षापासून प्रसिद्ध आहे. पण यावर्षी शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे मनमाड हुन निघणारी कैकाडी महाराजांची दिंडी निघू शकली नाही. मनमाडच्या सांस्कृतिक क्षेत्राचे भूषण समजली जाणारी ही दिंडी न निघाल्याने अनेक भाविकांना चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहे.
शहरात आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात परंतु या वर्षी साध्या पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली .सकाळी पांडुरंगाच्या मुर्तीला अभिषेक करून विधीवत पुजा करण्यात आली, शहरातील जुन्या असलेल्या श्री बालाजी विठ्ठल मंदिरा मध्ये भाविकांनी सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून सर्वजन दर्शन घेत होते , मंदिरामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी मंदिरातील सदस्य प्रत्येक भाविकांना सॅनिटाइझ करूनच प्रवेश देत होते.दरवर्षी गावात आषाढी निमित्ताने होणारी दिंडी या वेळी रद्द करण्यात आली .देशात आणि जगात आलेले कोरोना रुपी संकट लवकर दूर होऊन सर्व जग सुखी आणि निरोगी राहू दे ,सर्वाना मोकळा श्वास घेता येऊ दे,अशी विठुरायाला प्रार्थना करू या…