नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेले अभिजीत बांगर हे २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती होण्याआधी बांगर हे त्या पदावर होते. त्यानंतर महिनाभर त्यांच्याकडं कुठलाही कार्यभार नव्हता. सध्या ते नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत होते.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागलेले विजय राठोड हे २०१४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. ते याआधी गडचिरोली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून येऊ घातलेले मन्तादा राजा दयानिधी हे देखील २०१४ च्या बॅचचे अधिकारी असून गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते.
तीन महापालिकांच्या आयुक्तांच्या बदल्यांबरोबरच राज्य सरकारने आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी यांची नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे अतिरिक्त निवासी आयुक्त म्हणून बदली केली आहे. ते गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.