
मुंबई : सकाळच्या सात वाजे पासूनच किचन मधील शेगडी पेटवली जाते. निरनिराळे चमचमीत खाद्यपदार्थ बनवण्यास सुरुवात होते. जसे बेसनाची पाटवडी, तरीयुक्त रस्सा-आमटी, गवाराची, गंगाफळाची, कारल्याची, भेंडीची भाजी, दह्याची कढी, भात, तेलात तळून काढलेले उडदाचे वडे, अळूच्या वड्या, कांदा भजी, पापड, कुरडया आणि सोबतीला गोड-धोड मध्ये गव्हाची खीर, एवढे सर्व पंचपक्वान्न बनवण्यात कधी दहा वाजतात हे घरातील स्त्रीला समजत सुध्दा नाही. भाद्रपद महिन्याच्या पंधरवाड्यात घरात असलेल्या पूर्वजांच्या प्रतिमेसमोर फुलं-वेलाच्या रांगोळीच्या मधात पंचपक्वान्नांच ताट ठेवल्यावर पूर्वजांच हात जोडून स्मरण केल्या जाते.
घरात पसरलेल्या चमचमीत पदार्थांच्या खमंग वासाने घरातील सर्वांचंच लक्ष किचनच्या दिशेने वेधल्या जाऊन तोंडाला पाणी सुटल्यावाचून राहत नाही. असं असलं तरी पित्तरपाटातल्या नियमानुसार कावळ्याने घास खाल्ल्याशिवाय कोणीच जेवणार नाही ही प्रथा भुकेल्यांच्या आड येतेच. शहरी मंडळींना पंचपक्वान्न घेऊन बिल्डिंगच्या खाली यावं लागते. कोणत्या झाडावर किंवा आकाशात कुठे कावळा दिसतो का यावर नजर सैरावैरा फिरवावी लागते. तिथेच एखाद्या भिंतीवर ताट ठेवून, माणसाच्या भीतीने कावळा येणार नाही म्हणून दूरवर जाऊन उभं राहवं लागतं आणि कावळा येण्याची वाट बघावी लागते. कोंबड्या सारखी मान उंचावून इकडे तिकडे कावळा शोधावा लागतो. पण बराच वेळ गेल्यावर ही कावळा तिथे येतच नाही किंबहुना दिसत सुद्धा नाही असं बऱ्याचदा होतं. त्याचं महत्व अचानकच प्रचंड वाढलं जाते. एखाद्या पाहुण्यापेक्षा ही जास्त. कावळा यावा आणि त्याने घास खावा म्हणून त्या वेळेसाठी कावळ्या वरून तो “कावळोबा” केल्या जातो. त्याच्यासाठी गाऱ्हाणे घातली जातात. कावळोबाची गाणी काय, कावळोबाला प्रेमाने हाका मारणं काय, काही तर कावळ्या सारखे “काव-काव” आवाज ही काढतात. अशाप्रकारे मनुष्य मंडळी करत असते. हा प्रकार जणू वर्षभर कधी मतदाराकडे ढुंकून पण न बघणारा नेता अचानक निवडणुकीच्या काळात मतदाराला हात जोडून निर्लज्जा सारखा मत मागतो तसाच जाणवतो. पण कावळा काही लवकर येतच नाही. मग त्या वेळेस निसर्गातील त्या पक्ष्याचं महत्व समजते. वर्षभर ज्या निसर्ग घटकाचा आपण विचारही करत नाही शेवटी पितृपक्षात त्याची गरज पडतेच. आपल्या पूर्वजांच्या रूपात तो कावळोबा वर्षभर ही जिवंत असतोच पण आपलं कधी लक्षच नसते. ‘तहान लागली की विहिर खोदायची’, अशा मानवी मनोवृत्तीच उत्कृष्ट उदहारण.
खरं तर विचार केला तर अशा प्रथांच्या माध्यमातून निसर्गाशी तुमचं नातं जोडा असा संदेश कुठेतरी यातुन निदर्शनास येतो. त्याचे विविध पैलू असतील मग ते धार्मिक असो, वैज्ञानिक असो, परंपरा असो पण वास्तविकता ही आहे ही शहरात कमी होत चाललेलं पक्ष्यांचं प्रमाण याला करणीभूत आपणच आहोत. कावळ्याला आपण निसर्गाचे बिनपगारी साफसफाई कर्मचारीही बोलू शकतो, कारण शहरात कुठे घाण झाली, कचरा असला, मेलेला प्राणी दिसला की हे महाशय हजर. पण शहरात जर झाडंच उरणार नाहीत तर पक्षी राहतील कुठे ? घरटी बांधतील कुठे ? अशाने पक्षी प्रजाती लोप पावेल. म्हणूनच शहरात वृक्षारोपण हे महत्वाचं झालेलं आहे. ज्यामुळे पक्ष्यांच्या निवार्याची सोय होईल आणि ती टिकतील. कावळा हा निसर्गातील घटक दुर्मिळ होऊन येणाऱ्या काळात शाळेच्या पुस्तकांमध्येच बघायला मिळेल – ‘सी’ फॉर ‘क्रोव’, अशी वेळ येऊ देऊ नका. वृक्षारोपण करा, पक्ष्यांवर जीव लावा, त्यांना खाद्य खाऊ घाला. नाहीतर पुढची पिढी बोलेल पितृपक्ष आलाय, नैवद्य तयार आहे आता फक्त कावळा भाड्याने मिळेल का…?
– सुराज साधना सुरेश कुटे
(कल्याण)
संपर्क – 7021264578
