
नाशिक : मा. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये शाळाप्रवेशोत्सव अंतर्गत नवागत बालकांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वाटप, मोफत गणवेश वाटप व शाळापूर्व तयारी मेळावा क्र. २ नाविन्यपूर्ण विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. लेझीम व शालेय बँडपथकाच्या मदतीने परिसरातून जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. जनजागृती फेरीत विद्यार्थ्यांनी पहिली प्रवेशाबाबत विविध घोषफलक हातात घेऊन घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
जनजागृती फेरी शालेय प्रवेशद्वारावर येताच मराठमोळ्या पारंपारीक नऊवारी वेशभूषेत आलेल्या शाळेतील आठवीच्या मुलींनी शाळापूर्व तयारी मेळाव्यासाठी आलेल्या नवागत व दाखलपात्र विद्यार्थ्यांचे औंक्षण केले.
नवागत बालकांना शाळेचे आकर्षण वाटावे म्हणून सर्व बालकांना लेझीम व ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून शालेय प्रवेशद्वारापासून ते कार्यक्रमस्थळी सभागृहात सन्मानाने आणण्यात आले. यावेळी नवागत बालकांचा आनंद ओसंडून वाहत होता.
उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेतील गीतमंचाने शिक्षिका रुपाली ठोक यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर स्वागतपद्यातून केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सोनवणे काका यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी उपक्रमांचे महत्व व शाळापूर्व तयारी अभियानाचे फलित उपस्थित पालकांसमोर विशद केले.यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व मोफत गणवेश वितरण करण्यात आले.
नवागत बालकांनी आकर्षण असणार्या चाॅकलेटच्या झाडाची चॉकलेट्स लुटण्याचा यथेच्छ आनंद घेतला.तद्नंतर शाळापूर्व मेळावा क्र. २ चे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते नितिन परदेशी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
मेळाव्यात उपस्थित सर्व बालकांची नावनोंदणी करण्यात आली. नंतर शारिरीक विकास, बौध्दिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी या विविध आकर्षक स्टाॅल्सवर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येऊन आंनंददायी पध्दतीने, खेळ व प्रत्यक्ष कृतीतून बालकांची शाळापूर्व तयारीचे अवलोकन शाळेतील सर्व शिक्षकांनी केले. यावेळी नवागत बालकांसाठी खास तयार करण्यात आलेला शैक्षणिक सेल्फी पॉईंट बालक व पालकांचा आकर्षणबिंदू ठरला.शाळापूर्व तयारी मेळाव्यासाठी शालेय प्रवेशद्वार, शालेय परिसर, मेळावा खोली यांची हार,पानाफुलांनी, फुग्यांनी सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमास अनुरुप अशी रांगोळी शाळेतील शिक्षक विनोद मेणे यांनी आकर्षक पद्धतीने काढली तसेच फलकलेखनही केले.प्रमुख पाहुणे म्हणून नितिन परदेशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता साळुंके, उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, डायट या संस्थेने पाठविलेले निरीक्षक प्राचार्या ज्युनिअर कॉलेज आॅफ एज्युकेशन दिंडोरी श्रीम. एम. जे. थेटे मॅडम, आदर्श अध्यापक विद्यालयाच्या वसुधा जोशी व व्हि. टि. देवरे मॅडम, प्रथम संस्थेच्या समन्वयिका निकिता मोकळे, समग्र शिक्षा अभियानाच्या संध्या पाटिल, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या नंदा मंत्रे, प्रणिता कोल्लूर, डि एड काॅलेजच्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन शिक्षिका रुपाली ठोक यांनी तर आभारप्रदर्शन जेष्ठ शिक्षक किसन काळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद मेणे, प्रविण गायकवाड, प्रमिला देवरे, कविता वडघुले, शोभा मगर, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, सुनंदा बच्छाव, प्रणिता ओतूरकर यांनी परीश्रम घेतले.
